वर्धा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️
- वर्धा : ऑपरेशन मुस्कान–१४ अंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांनी तीन वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस नागपूर येथून अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली असून पीडित मुलीचा शोध घेण्यात यश आले आहे.
- याबाबत सविस्तर माहिती अशी की, सावंगी मेघे पोलीस ठाण्यात ५ सप्टेंबर २०२३ रोजी फिर्यादीने तोंडी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची नोंद पोलीस ठाणे सावंगी मेघे येथे गुन्हा क्रमांक ४८३/२०२३ अन्वये भादंवि कलम ३६३ अंतर्गत करण्यात आली होती. तपासादरम्यान पीडित मुलगी व आरोपीचा शोध न लागल्याने सदर गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला.
- मा. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या विशेष सूचनेनुसार पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गठित करण्यात आले. खात्रीशीर मुखबिर व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी अमर अशोक नंदेश्वर (वय २५, रा. भिमवाडी, थुल ले-आऊट, सिंदी मेघे) हा पीडित मुलीस घेऊन नागपूर येथे राहत असल्याची माहिती निष्पन्न झाली.
- त्यानुसार पथकाने सापळा रचून एम्स रुग्णालयासमोरील रस्त्यावर, सोनेगाव (जि. नागपूर) येथून आरोपीस ताब्यात घेतले. चौकशीत पीडित अल्पवयीन मुलगी आरोपीसोबत राहत असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीस कायदेशीर प्रक्रियेनुसार अटक करण्यात आली असून पुढील तपास सावंगी मेघे पोलीस ठाणे करीत आहे.
- ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा व सायबर सेलच्या पथकाने संयुक्तरित्या केली.

Post a Comment
0 Comments