हिंगणघाट पत्रकार संघालाच प्राधान्य? इतर पत्रकारांना डावलल्याचा आरोप
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख
हिंगणघाट : पत्रकार संघाच्या वतीने सरकारी जागा व आमदार निधी मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत शहरातील इतर पत्रकारांना सहभागी करून घेतले नसल्यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक स्तरावर कार्यरत असलेल्या अनेक पत्रकारांनी यावर आक्षेप घेत, “ही मागणी सर्व पत्रकारांच्या वतीने केली जात असल्याचे दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात इतरांना विश्वासात घेतले गेले नाही,” असा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रस्तावामागील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही पत्रकारांनी सांगितले की, शहरात विविध माध्यमांशी संबंधित पत्रकार मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत केवळ एका संघटनेलाच प्राधान्य देऊन प्रस्ताव सादर करणे योग्य नाही. सर्वांना समान संधी देणे आवश्यक होते, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, संबंधित प्रस्ताव मंजूर झाला असल्यास त्याबाबतची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, तसेच निधी किती मंजूर झाला आणि संघटनेची निवड कोणत्या निकषांवर करण्यात आली, याबाबत स्पष्टता देण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणी लवकरच संबंधित पदाधिकारी व प्रशासनाकडून अधिकृत माहिती घेण्यात येणार असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments