"
वाहतूक नियमांचे पालन करा, अपघात टाळा; मानवी चुका ठरतात अपघाताचे कारण" – सहा. फौ. रियाज खान
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया
एनसीसी छात्र सैनिकांसाठी वाहतूक जनजागृती कार्यशाळा संपन्न
वर्धा, दि. १५ जून : वर्धा जिल्ह्यात दिवसेंदिवस रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे प्रतिपादन वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक फौजदार रियाज खान यांनी केले. मानवी चुका अपघाताला आमंत्रण देतात, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
२१ महाराष्ट्र बटालियनच्या सेवाग्राम येथे आयोजित एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबिरांतर्गत दि. १५ जून रोजी बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात वाहतूक नियमांविषयी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत एनसीसी छात्र सैनिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व व सुरक्षित वाहनचालना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या आदेशानुसार सहाय्यक फौजदार रियाज खान यांनी छात्र सैनिकांना विस्तृत माहिती दिली.
यावेळी त्यांनी दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे, चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट लावणे, वाहन नियंत्रित वेगात चालविणे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर टाळणे तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आवाहन केले. तसेच अपघात झाल्यास तातडीने टोल फ्री क्रमांक १०८ व ११२ वर संपर्क साधण्याबाबतही माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेला चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह, चंद्रपूर व भद्रावती तसेच वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट व समुद्रपूर येथील सुमारे १२५ ते २०० एनसीसी छात्र सैनिक उपस्थित होते.
याप्रसंगी पोलीस अमलदार आरिफ खान, वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा, सुभेदार तुरा सिंग, सुभेदार प्रमोद घोडपडे, हवालदार मनजीत सिंग, विशाल पुणे, मिरज सिंग व संदीप कुमार आदी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments