मुंबई महापौरपदासाठी पडद्यामागे रस्सीखेच; शिंदे गटातील नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांना यश मिळाले असले, तरी बहुमत अत्यंत काठावरचे असल्याने महापौरपदावरून प्रचंड राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबईचा पुढचा महापौर कोणाचा होणार, यावरून सध्या कमालीची गुप्तता पाळली जात असून, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपने या निवडणुकीत ८९ जागांवर विजय मिळवला असून, महापौर निवडीसाठी आवश्यक असलेला ११४ चा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) च्या २९ नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हीच संधी साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपसमोर अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, संभाव्य ‘दगाफटका’ टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिंदे यांनी आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील पंचतारांकित ताज लँडस् एन्ड हॉटेलमध्ये हलवले आहे. महापौर निवडीपर्यंत नगरसेवकांना तेथेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असल्याने मुंबईतील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, शिंदे गटातील काही नवनिर्वाचित नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीशी संपर्क साधून, “आमच्या मनात उद्धवजी आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल कोणतेही वैर नाही,” असे स्पष्ट केल्याचे समजते. या गुप्त हालचालींची कुणकुण लागताच शिंदे यांनी तातडीने नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
यातच उद्धव ठाकरे यांनी केलेले, “देवाची इच्छा असेल तर मुंबईचा पुढचा महापौर आपलाच असेल,” हे सूचक वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या या विधानामागे संभाव्य समीकरणे बदलण्याचे संकेत असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेतही अनेक सूचक विधाने केली. “मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा, यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे. अनेकांशी चर्चा सुरू आहे. आम्ही तटस्थपणे या हालचाली पाहत असलो, तरी पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत,” असा दावा त्यांनी केला.
संजय राऊत पुढे म्हणाले की, शिंदे गटातील अनेक नवनिर्वाचित नगरसेवक हे मूळचे शिवसैनिक आहेत. मुंबईबद्दलची भावनिक नाळ आजही त्यांच्यात आहे. त्यामुळे भाजपचा महापौर होऊ देऊ नये, असा विचार त्यांच्या मनात असल्याचे संकेत मिळत आहेत. “नगरसेवकांना कितीही कोंडून ठेवले, तरी संपर्काची साधने असतात आणि संदेश पोहोचतच असतात,” असे सूचक विधानही त्यांनी केले.
महापौर निवडीपर्यंत सुरू असलेली ही राजकीय रस्सीखेच नेमकी कुठे थांबते, शिवसेनेत पुन्हा फूट पडते की नवे समीकरण आकारास येते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राजकीय
मुंबई महापौरपदासाठी पडद्यामागे रस्सीखेच; शिंदे गटातील नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात?
मुंबई महापौरपदासाठी पडद्यामागे रस्सीखेच; शिंदे गटातील नगरसेव
मुंबई (प्रतिनिधी): अमोल जाधव ✍️✍️

Post a Comment
0 Comments