वर्धा : प्रतिनिधी फैमुद्दीन शेख
व्हिडिओ गेम पार्लरच्या आड बेकायदेशीर जुगार चालविणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल १९ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे ७ लाख ८३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माननीय पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये, दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी जुगार व्यवसायाविरोधात विशेष मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान वर्धा शहर पोलीस ठाणे हद्दीतील वर्धा रेल्वे स्टेशनसमोरील आठवडी बाजार परिसरात असलेल्या एका व्हिडिओ गेम पार्लरवर छापा टाकण्यात आला.
सदर पार्लरचा मालक धनराज खैरकार हा आपल्या पार्लरमधील इलेक्ट्रॉनिक मशिन्सच्या माध्यमातून, नोकरांच्या सहाय्याने जुगाराचा हार–जीतचा व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता, तेथे ग्राहक जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पोकर व खटखट प्रकारच्या ३५ इलेक्ट्रॉनिक मशिन्स, प्लास्टिक खुर्च्या, ६८,५६० रुपये रोख रक्कम असा एकूण ७,८३,५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी एकूण १९ आरोपींविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Post a Comment
0 Comments