नायलॉन मांजाच्या वापर व विक्रीवर कडक कारवाई; विक्रेत्यांना २.५ लाख, वापरकर्त्यांना २५ हजार दंड
वर्धा : मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजाच्या वापराबाबत स्वतःहून दाखल केलेल्या SMPL No. 01/2021 प्रकरणात दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत कठोर आदेश पारित केले आहेत. या आदेशानुसार, प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक अथवा वापर करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार,
नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आल्यास संबंधित दुकानदारावर जागीच २.५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविताना कोणी आढळून आल्यास संबंधित व्यक्तीकडून २५ हजार रुपयांचा दंड तत्काळ वसूल केला जाईल.
अल्पवयीन मुले नायलॉन मांजाचा वापर करताना आढळल्यास, त्यांच्या पालकांकडूनही २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. दंड भरण्यास टाळाटाळ केल्यास संबंधितांकडून जमीन महसूल कायद्यानुसार दंड वसूल केला जाणार आहे. प्रत्येक उल्लंघनासाठी स्वतंत्र दंड आकारला जाईल आणि दंडात्मक कारवाईनंतर दोषींवर प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
दरम्यान, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी पर्यावरणपूरक सुती धाग्याचा (साध्या मांजाचा) वापर करावा. नायलॉन मांजाची विक्री अथवा त्याचा वापर होत असल्याचे आढळल्यास तात्काळ ‘११२’ किंवा ८८८८३३८३५४ या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हिंगणघाट प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️


Post a Comment
0 Comments