Type Here to Get Search Results !

एकाच नंबरचे दोन ट्रक वापरून रेतीची तस्करी; सेलू पोलिसांनी उघड केला मोठा गोरखधंदा


वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️
 

बनावट नंबर प्लेटने पांढऱ्या रेतीची तस्करी; दोन ट्रकसह ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सेलू :- 

चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात अवैधरित्या पांढऱ्या रेतीची वाहतूक करण्यासाठी एकाच नोंदणी क्रमांकाच्या बनावट नंबर प्लेटचा वापर केल्याप्रकरणी सेलू पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन ट्रक, पांढरी रेती व बनावट नंबर प्लेट असा एकूण ७५ लाख २१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी इरशादखॉ सिकंदरखॉ पठाण (वय ५०, रा. सेलू) व अमित लिलाधर मस्के (रा. महाबळा, ता. सेलू) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन सेलू येथे गुन्हा क्रमांक ४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात असे निष्पन्न झाले की, दिनांक ११ ते १४ जानेवारी २०२६ दरम्यान चंद्रपूर येथील वैनगंगा नदीवरील रंगमोचन रेती घाटावरून विना रॉयल्टी अंदाजे ४५६.६८ घनफूट (४.५० ब्रास) पांढरी रेती अवैधरित्या आणण्यात आली. रेती तस्करीसाठी मूळ ट्रक क्रमांक MH 32 AK 1786 असताना, हुबेहूब समान मॉडेलच्या दुसऱ्या ट्रकवर MH 32 AS 2786 या क्रमांकाच्या बनावट नंबर प्लेट लावून शासनाची फसवणूक करण्यात आली.

१४ जानेवारी रोजी मुखबिराकडून मिळालेल्या माहितीनुसार के.जी.एन. ट्रान्सपोर्ट, सेलू व रेहकी रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर एकाच क्रमांकाचे दोन ट्रक आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरटीओ व तहसीलदारांच्या अहवालाच्या आधारे हा प्रकार उघडकीस आणला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर व सेलू पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रितम निमगडे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments