Type Here to Get Search Results !

फोनपेवर पैसे पाठवल्याचा बनाव करून सोनाराची फसवणूक; अमरावतीतील दोन आरोपी निष्पन्न, ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त

                 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख  🗞️

           


देवळी (जि. वर्धा) : फोनपे अ‍ॅपद्वारे पैसे पाठवल्याचा बनाव करून सोन्याची अंगठी घेऊन सोनाराची फसवणूक करणाऱ्या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी निष्पन्न करत त्यांच्या ताब्यातून सोन्याची अंगठी, मोबाईल व बिल असा एकूण ४७,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस ठाणे देवळी येथे दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी श्री. विवेक प्रकाशचंद कांकरीया (वय ५०, रा. वार्ड क्र. ०५, देवळी) यांनी तक्रार दाखल केली होती. दि. १० जानेवारी २०२६ रोजी दोन इसम त्यांच्या सोन्याच्या दुकानात आले. त्यांनी २ ग्रॅम २३० मिलीग्रॅम वजनाची, ३२,३०० रुपये किमतीची सोन्याची अंगठी पसंत केली. पैसे देण्यासाठी त्यांनी फिर्यादीचा बँक क्यूआर कोड मोबाईलद्वारे स्कॅन करून पैसे पाठवल्याचे भासविले. आरोपीच्या मोबाईलमध्ये ‘राईट क्लिक’चे चिन्ह दिसल्याने फिर्यादीने व्यवहार पूर्ण झाल्याचा समज करून अंगठी व त्याचे बिल दिले. मात्र काही वेळाने खात्याची तपासणी केली असता पैसे जमा न झाल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी समांतर तपास करत गोपनीय बातमीदार, तांत्रिक विश्लेषण तसेच यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींची माहिती तपासली. त्यातून सदर गुन्हा अमरावती जिल्ह्यातील आरोपी १) उमेर मिर्झा जफर बेग मिर्झा (वय ३५, रा. सागर नगर महाजनपुरा, अमरावती) व २) शेख तहसीम शेख अकबर (वय २५, रा. हैदरपुरा हनुमान नगर, अमरावती) यांनी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार दोन्ही आरोपींना अमरावती येथून ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून गुन्ह्यातील ३२,३०० रुपये किमतीची सोन्याची अंगठी, एक कागदी बिल व १५,००० रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल असा एकूण ४७,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस ठाणे देवळी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि. विजयसिंग गोमलाडू तसेच पोलीस अंमलदार चंदकांत बुरंगे, सचिन इंगोले, भूषण निघोट, प्रमोद पिसे, अमोल नगराळे व मंगेश चावरे यांनी केली.

Post a Comment

0 Comments