हिंगणघाटमध्ये मेवात धाब्यावर छापा; गोवंश मांसासह 39 हजारांचा मुद्देमाल जप्त
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख
हिंगणघाट : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मेवात धाब्यावर पोलिसांनी छापा टाकून गोवंश मांस प्रकरण उघडकीस आणले. या कारवाईत सुमारे 39 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 मार्च 2026 रोजी रात्री 8 ते 9.30 वाजताच्या दरम्यान हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत मेवात धाब्यावर गोवंश मांस साठवणूक व विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पशुवैद्यकीय अधिकारी, पंच व पोलीस स्टाफसह धाब्यावर छापा टाकण्यात आला.
छाप्यात धाब्याच्या किचनमध्ये एका मोठ्या गजामध्ये जनावराचे मांस व अवयवाचे तुकडे आढळून आले. चौकशीदरम्यान सदर मांस गाय व बैलाचे असल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंगणघाट येथूनच अशा प्रकारचे मांस अनेक शहरांमध्येही पुरवठा करण्यात येत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून पुढील तपास अधिक व्यापक करण्यात येण्याची शक्यता आहे.
या कारवाईत 10 किलो मांस (किंमत 4 हजार रुपये), मांस साठवण्यासाठी वापरलेला फ्रिज (20 हजार रुपये), ओप्पो कंपनीचा मोबाईल (10 हजार रुपये), मोठा गज (2 हजार रुपये) आणि विक्रीची 3 हजार 700 रुपये रोख रक्कम असा एकूण 39 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मोहम्मद अकील समन खान (वय 25, रा. हरियाणा, सध्या मेवात धाबा, हिंगणघाट) व एक स्थानिक इसम यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पद्माकर मुंडे व डी.बी. पथकाने केली.
पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.

Post a Comment
0 Comments