Type Here to Get Search Results !

निराधारांचे आधार बनले आमदार समीर कुणावार : हिंगणघाट व समुद्रपूर येथे विक्रमी ७२० लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ

 

निराधारांचे आधार बनले आमदार समीर कुणावार : हिंगणघाट व समुद्रपूर येथे विक्रमी ७२० लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ

               

               वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख

हिंगणघाट व समुद्रपूर येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत्या पार पडली. समाजातील वंचित व निराधार घटकांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा, या उद्देशाने आयोजित या बैठकीत विविध प्रलंबित अर्ज व प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही विलंबाशिवाय मदत मिळावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना आमदार कुणावार यांनी दिल्या.


यावेळी आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते हिंगणघाट येथे ४३० तर समुद्रपूर येथे २९० अशा एकूण ७२० पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या मासिक अनुदानाची नोंद निश्चित करून त्यांना योजनेचा लाभ सुरू करण्यात आला.


विशेष म्हणजे आमदार समीर कुणावार हे हिंगणघाट व समुद्रपूर येथील संजय गांधी निराधार योजना समितीचे स्वतः अध्यक्ष म्हणून कार्यरत असून या प्रक्रियेत ते वैयक्तिकरित्या लक्ष घालून सातत्याने पाठपुरावा करत असतात. त्यांच्या या सक्रिय नेतृत्वामुळे व प्रभावी समन्वयामुळे वर्धा जिल्ह्यातील सर्वाधिक विक्रमी लाभार्थ्यांची नोंद हिंगणघाट व समुद्रपूर या दोन्ही तालुक्यांत करण्यात आली असून, समाजातील गरजू घटकांपर्यंत योजना पोहोचविण्यात या तालुक्यांनी जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.


आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शासनाने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मासिक अनुदानाची रक्कम ₹१२०० वरून ₹१५०० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडण्यास मदत होणार आहे.


या योजनेअंतर्गत १८ ते ६५ वयोगटातील निराधार व्यक्ती, अनाथ मुले, दिव्यांग नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण (कर्करोग, एड्स, कुष्ठरोग इ.), विधवा व घटस्फोटित महिला, तृतीयपंथी तसेच सिकलसेल आजाराने पीडित नागरिकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यासाठी लाभार्थ्याचे नाव दारिद्र्यरेषेखालील यादीत असणे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२१,००० पर्यंत असणे आवश्यक आहे.


शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने पात्र व गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही प्रशासन व लोकप्रतिनिधींची संयुक्त जबाबदारी आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी प्रशासनानेही संवेदनशीलतेने कार्य करावे, असे आमदार समीर कुणावार यांनी यावेळी स्पष्ट केले.


शासन निर्णयानुसार गठीत समितीमध्ये हिंगणघाट व समुद्रपूर येथील नियुक्त सदस्य म्हणून श्री. विनोद विटाळे, श्री. समीर धारकर, सौ. किर्ती सायंकार, श्री. शंकर आत्राम, श्री. निलेश किटकुले, श्री. प्रदिप कांबळे, श्री. भाग्येश देशमुख, श्री. विकास इंगळे, श्री. मारोती साठे तसेच समुद्रपूर तालुक्यातील सदस्य म्हणून श्री. शेषराव तुळणकर, श्री. हेमंत राऊत, श्री. गोपाळराव वंगळ, श्री. बहादुरसिंग अकाली, श्री. राजू निमजे, सौ. समिक्षा मांडवकर, सौ. शारदाताई तुमडाम, श्री. प्रशांत धुळे, श्री. मंगेश राऊत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. आकाश अवतारे, हिंगणघाटचे तहसीलदार श्री. योगेश शिंदे, समुद्रपूरचे तहसीलदार श्री. कपिल हाटकर, हिंगणघाटचे गटविकास अधिकारी श्री. ज्ञानेश्वर सावसाकळे, समुद्रपूरचे गटविकास अधिकारी श्री. सतीश टिचकुले तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments