हिंगणघाटमध्ये एमडी ड्रग्ससह युवक अटक; 83 हजारांचा मुद्देमाल जप्त
: वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख
हिंगणघाटशहरातील संत कबीर वॉर्ड परिसरातील एका युवकाला मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या मॅफेड्रान (एमडी) या अंमली पदार्थासह हिंगणघाट पोलिसांनी रंगेहात अटक केली. पोलिसांनी कारवाईदरम्यान अंमली पदार्थ, मोटारसायकल व रोख रक्कम असा एकूण 83 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील सहायक पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे व पथकातील कर्मचारी रात्री गस्त घालत असताना त्यांना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. संत कबीर वॉर्ड येथे राहणारा गुड्डू सूर्यवंशी हा युवक त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलवरून मॅफेड्रान हा मनोव्यापारावर परिणाम करणारा अंमली पदार्थ विक्रीसाठी राम मंदिर रोडमार्गे हिंगणघाटकडे येत असल्याची माहिती मिळाली.
ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार राम मंदिर रोड परिसरात सापळा रचून नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान संशयित इसमाला थांबवून त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव गुड्डू महेश सूर्यवंशी (वय 31, रा. संत कबीर वॉर्ड, हिंगणघाट, जि. वर्धा) असे सांगितले.
पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून प्लास्टिकच्या पिशवीत भरलेला मॅफेड्रान हा अंमली पदार्थ मिळून आला. त्याचे प्लास्टिकसह एकूण वजन 5.68 ग्रॅम असून त्याची किंमत सुमारे 13 हजार रुपये आहे. तसेच बजाज कंपनीची पल्सर 150 (क्र. MH 31 AF 3981) मोटारसायकल किंमत 70 हजार रुपये व 440 रुपये रोख असा एकूण 83 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत अपराध क्र. 343/26 कलम 8 (क), 21 (B) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 130/177, 181, 3(1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सपोनि दीपक वानखेडे, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे, पो.शि. मंगेश वाघमारे व पोशी रोहित साठे यांनी सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी सपोनि पद्माकर मुंडे करीत आहेत.

Post a Comment
0 Comments