वर्धा शहरात अट्टल दुचाकी चोर अटकेत; चोरीची बर्गमॅन मोपेड जप्त
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख
वर्धा : शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अट्टल दुचाकी चोराला अटक करून चोरीस गेलेली मोपेड जप्त केली आहे. या कारवाईमुळे शहरातील वाहनचोरीच्या घटनेचा उलगडा झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेंद्र रामचंद्र महाकाळकर (वय ५१, रा. गोपुरी चौक, नागपूर रोड, वर्धा) हे १२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता आपली सुजुकी कंपनीची ग्रे रंगाची बर्गमॅन मोपेड (क्रमांक एमएच-३२ ए.क्यू. ९९७०) घरी आणून घरासमोर लॉक करून ठेवली होती. त्यानंतर ते बांधकामाच्या साईटवर सावंगी येथे गेले. सायंकाळी ६ वाजता घरी परत आल्यावर त्यांची मोपेड घरासमोर दिसली नाही. घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर अज्ञात व्यक्तीने मोपेड चोरी केल्याचे निदर्शनास आले. यावरून वर्धा शहर पोलीस ठाण्यात अप.क्र. २९९/२६ कलम ३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
दरम्यान तपास सुरू असताना १७ मार्च रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक संशयित व्यक्ती ग्रे रंगाची बर्गमॅन मोपेड विना नंबर फिरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून गुन्हे पथकाने विसावा चौक, इतवारा येथे सापळा रचून संबंधित इसमाला थांबवले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अनुराग प्रविण धाबर्डे (वय २०, रा. तळोदी (कुटकी) ता. सेलू, जि. वर्धा) असे सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडील विना नंबरची सुजुकी बर्गमॅन मोपेड (चेसिस क्र. MB8EA11DHL8131824) बाबत विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र सखोल चौकशीत त्याने १२ मार्च रोजी गोपुरी चौक, नागपूर रोड येथून ही मोपेड चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केल्यानंतर गाडीची नंबर प्लेट काढून तो ती वापरत होता. पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपीकडून अंदाजे ४५ हजार रुपये किंमतीची मोपेड जप्त केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाधमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार भुसारी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद रासकर यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस हवालदार महेंद्र पाटील, अभिजित वाघमारे, पोलीस अंमलदार रंजीत भुरसे आणि अमोल साळवन यांनी केली.

Post a Comment
0 Comments