गिरडमध्ये अवैध गॅस सिलेंडर वाहतूक पुन्हा उघड; १९ रिकामे सिलेंडर जप्त, परिसरात खळबळ
गिरड प्रतिनिधी अब्दुल कदिरगिरड : नागपूर जिल्ह्यातील नांद येथील भारत गॅस एजन्सीकडून गिरड येथे अवैधरित्या सिलेंडरची वाहतूक होत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस व पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत वाहनातून १९ रिकामे सिलेंडर जप्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, नांद येथील भारत गॅस एजन्सीकडून गिरड परिसरात ९६५ रुपयांच्या सिलेंडरची तब्बल ११०० रुपयांत अवैध विक्री केली जात असल्याचा प्रकार १५ मार्च रोजी हिमांशु विवेक डेकाटे यांच्या व्हिडिओमधून समोर आला होता. याप्रकरणी तालुका पुरवठा अधिकारी कमलेश कुमरे हे चौकशी करत असतानाच १८ मार्च रोजी पुन्हा अवैध वाहतुकीची गुप्त माहिती पुरवठा विभागाला मिळाली.
त्यानुसार पुरवठा विभागाने पोलिसांसह सापळा रचून गिरड–सिरसी रोडवर एमएच ४० एके १८२२ या वाहनाचा सिनेटाईल पाठलाग केला. कारवाईची चाहूल लागताच वाहन चालकाने वाहन पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन गिरड येथे वळवून गॅस पॉईंट नसलेल्या सुरेश गिरडे यांच्या घराजवळ थांबविण्यात आले.
अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये १९ रिकामे सिलेंडर आढळून आले. वाहन चालक विष्णू घरत याला विचारपूस केली असता ग्राहकांचे रिकामे सिलेंडर एजन्सी पॉईंटवर नेऊन भरलेले सिलेंडर आणण्यासाठी नेले जात असल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, तालुका पुरवठा अधिकारी कमलेश कुमरे यांनी घटनास्थळी पंचनामा करून सुमारे ४१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेले सिलेंडर समुद्रपूर येथील गॅस पॉईंटवर जमा करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment
0 Comments