AI च्या मदतीने वर्धा LCB ची मोठी कारवाई; आंतरराज्यीय चेन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेखवर्धा : स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तांत्रिक विश्लेषण व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या साहाय्याने आंतरराज्यीय चेन स्नॅचिंग करणाऱ्या शातिर टोळीचा पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे. या टोळीने महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण केली होती.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ११ गुन्ह्यांचा उलगडा केला असून त्यात १० चेन स्नॅचिंग आणि १ दुचाकी चोरीचा समावेश आहे. सुमारे २० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये १२६ ग्रॅम ३७० मिलीग्राम सोने, एक आयफोनसह दोन मोबाईल फोन तसेच बजाज पल्सर दुचाकीचा समावेश आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी हसनैन उर्फ हसन अली जाफर अली (वय २१, रा. भुसावल) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र व मध्य प्रदेशात अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान वर्धा कंट्रोल रूमच्या मदतीने विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने धूसर फुटेजमधून आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. आरोपीने जून २०२५ मध्ये भोपाल येथील चुनाभट्टी पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या पल्सर दुचाकीचा वापर चेन स्नॅचिंगसाठी केल्याचे निष्पन्न झाले.
तसेच तपासात आरोपीची पत्नी सुखैना अली व बहीण सना अली या चोरीचे दागिने ग्वाल्हेर येथील ज्वेलर्सकडे गहाण ठेवण्यास मदत करत असल्याचे उघड झाले. या प्रकरणातील दुसरा आरोपी आतिश उर्फ सादिक इबादत अली हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
नोंद गुन्ह्यांमध्ये रामनगर (वर्धा) येथे ६, वर्धा शहरात १, सावंगी (मेघे) येथे १, पुलगाव येथे २, यवतमाळ (अवधूतवाडी) येथे १ तसेच मध्य प्रदेशातील मंडला येथे १ आणि भोपाल येथे दुचाकी चोरीचा १ गुन्हा समाविष्ट आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अतिरिक्त पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद चौधरी व त्यांच्या LCB तसेच सायबर पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
विशेष म्हणजे, आरोपी हसन अली हा जळगाव जिल्ह्यातील पाच गंभीर गुन्ह्यांतही फरार होता. या कारवाईमुळे वर्ध्यासह इतर जिल्ह्यांतील अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

Post a Comment
0 Comments