शेकापूर (बाई), कांढळी व सिंदी (रेल्वे) येथील आरोग्य सुविधांसाठी आमदार समीर कुणावार यांची धडपड; मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेखहिंगणघाट तालुक्यातील मौजा शेकापूर (बाई) तसेच समुद्रपूर तालुक्यातील कांढळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला गती देणे आणि सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालयाच्या स्थापनेबाबत निर्णय प्रक्रियेला चालना देण्यासाठी विधानसभेचे आमदार समीर कुणावार यांच्या विशेष प्रयत्नातून शासनस्तरावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आमदार कुणावार यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे.
या संदर्भात दिनांक ११ मार्च रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या दालनात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये संचालक (आरोग्य सेवा – रुग्णालये) मुंबई, उपसचिव – सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, सहसंचालक (रुग्णालये) आरोग्य सेवा, सहसंचालक (प्राथमिक आरोग्य केंद्र) आरोग्य सेवा, उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर परिमंडळ, जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा, जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा तसेच इतर संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
बैठकीदरम्यान शेकापूर (बाई) व कांढळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार समीर कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रस्तावातील आवश्यक बाबींचा आढावा घेत अंतिम मंजुरीच्या दिशेने सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. तसेच सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक चर्चा झाली असून या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
सध्या शेकापूर (बाई), कांढळी व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी दूरवर जावे लागत असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या भागात तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याची बाब आमदार समीर कुणावार यांनी बैठकीत अधोरेखित केली. त्याचप्रमाणे सिंदी (रेल्वे) येथे प्रस्तावित ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यास परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना तातडीची व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले.
प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर शेकापूर (बाई), कांढळी तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना तपासणी, उपचार आणि विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ गावाजवळच मिळणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या प्रस्तावांना आता सकारात्मक दिशा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Post a Comment
0 Comments