हिंगणघाटात एमडी ड्रग्ससह युवक अटकेत; १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख
हिंगणघाट : अंमली पदार्थ विरोधी कृती दल नागपूर व हिंगणघाट पोलीसांच्या संयुक्त कारवाईत एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्स बाळगणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली असून सुमारे १ लाख १० हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी कृती दल नागपूरचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सादिक शेख हे हिंगणघाट डीबी पथकासह परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चौका शाळा मैदान परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली.
या कारवाईत समीर खुशालराव गायकवाड (वय ३०, रा. नन्नाशा वार्ड, हिंगणघाट) याची झडती घेतली असता त्याच्याकडून ५.७८ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) हा मनोव्यापारावर परिणाम करणारा अंमली पदार्थ आढळून आला. या अंमली पदार्थाची किंमत सुमारे १५ हजार ९३० रुपये आहे.
तसेच आरोपीकडून टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर मोपेड (क्र. MH 32 AQ 9414) किंमत सुमारे ८० हजार रुपये आणि विवो कंपनीचा मोबाईल फोन किंमत १५ हजार रुपये असा एकूण १,१०,९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट १९८५ च्या कलम ८(क) व २१(ब) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सपोनि पद्माकर मुंडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सादिक शेख, पोलीस हवालदार प्रदीप डोंगरे, अभिजित गावंडे तसेच डीबी पथकातील प्रशांत ठोंबरे, राजेश शेंडे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे व रोहित साठे यांनी सहभाग घेतला.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.

Post a Comment
0 Comments