दहेगाव पोलिसांच्या कारवाईवर संशय; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
लॉटरी-दारू प्रकरणात निरपराधांना आरोपी केल्याचा आरोप पत्रकाराचा गंभीर दावा
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया
वर्धा: प्रतिनिधी
हमदापूर येथील ऑनलाईन लॉटरी सेंटर व दारूबंदी प्रकरणात दहेगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी केलेली कारवाई आणि उपलब्ध परिस्थिती यामध्ये विसंगती दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यवसाय करणारी व्यक्ती प्रत्यक्ष जागेवर उपस्थित असताना तसेच दुकान भाडेतत्त्वावर घेतल्याचे दुकानावरील नावावरून स्पष्ट होत असतानाही दुकानमालकाला आरोपी करण्यात आल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेला सोनू हा दारू व्यवसायाशी संबंधित असल्याचे सांगितले जात असले तरी तो संबंधित लॉटरी दुकानात बसत असल्याची माहिती आहे. तसेच प्रफुल हा लॉटरी व्यवसायाशी संबंधित असला तरी दारू व्यवसायाशी त्याचा संबंध नसल्याचा दावा करण्यात येत आहे. दुकानमालक विक्की याचा या घटनेशी कोणताही थेट संबंध नसतानाही त्याला आरोपी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रफुल व दुकानमालक विक्की यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी पैशांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर काही कागदपत्रे जमा करण्यासाठी प्रफुल याला दहेगाव पोलीस स्टेशन येथे बोलावण्यात आले होते.
यावेळी पोलिसांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान "माझा व्यवसाय लॉटरीचा आहे, मग माझ्यावर दारूबंदीचा गुन्हा का दाखल करण्यात आला?" असा प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यावर "दारू लॉटरी दुकानात सापडली" असे उत्तर देण्यात आले. त्यानंतर दुकानमालकाचा संबंध नसताना त्याच्यावर गुन्हा कसा दाखल करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर संबंधित पोलिसांनी "आम्ही गांजाचा गुन्हा दाखविला नाही" असे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संभाषणाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गुन्ह्यात अडकविण्याची भाषा वापरण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या मते, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्यास संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कथित अनैतिक व्यवहार आणि कारवाईमागील वस्तुस्थिती समोर येऊ शकते. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज, स्टेशन डायरी, कॉल रेकॉर्ड, जप्ती प्रक्रिया आणि संबंधित सर्व नोंदींची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments