Type Here to Get Search Results !

अमली पदार्थांविरोधात गिरड पोलिसांची दुचाकी रॅली; समाजानेही पुढे येण्याचे आवाहन

 अमली पदार्थांविरोधात गिरड पोलिसांची दुचाकी रॅली; समाजानेही पुढे येण्याचे आवाहन


वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया

समुद्रपूर : अमली पदार्थांचे वाढते व्यसन हे आज समाजासमोरील गंभीर आव्हान बनले असून त्याच्या विळख्यात अडकणारी तरुण पिढी स्वतःचे भविष्यच नव्हे, तर कुटुंबाचेही सुख हिरावून घेत आहे. या सामाजिक संकटाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी गिरड पोलिस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी अमली पदार्थांविरोधात दुचाकी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीद्वारे गिरडसह परिसरातील गावांमध्ये व्यसनमुक्त समाजाचा संदेश देण्यात आला.

गिरड पोलिस ठाण्यातून निघालेल्या रॅलीला पोलिस निरीक्षक विकास गायकवाड, मोहगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नवघरे, पत्रकार गजानन गारघाटे आणि पोलिस उपनिरीक्षक गोमेद पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

रॅलीदरम्यान पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान आणि पोलिस पाटील यांनी अमली पदार्थांविरोधातील घोषणाबाजी करत नागरिकांना व्यसनाच्या दुष्परिणामांची माहिती दिली. युवकांनी व्यसनापासून दूर राहावे, पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवावे आणि समाजातील प्रत्येक नागरिकाने अमली पदार्थांच्या विक्री अथवा तस्करीची माहिती पोलिस प्रशासनाला देऊन सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी पोलिस निरीक्षक विकास गायकवाड यांनी अमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी केवळ पोलिस प्रशासनाचे प्रयत्न पुरेसे नसून नागरिकांचे सक्रिय सहकार्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या जनजागृती रॅलीत पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, परिसरातील पोलिस पाटील तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समाजातील तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्याचा आणि सुरक्षित, सुदृढ व व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

Post a Comment

0 Comments