हिंगणघाटात अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ट्रॅक्टर विनाक्रमांक असल्याने मालक कोण? मोठ्या रॅकेटचा तपास होणार का ?
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया
हिंगणघाट :दि. २९ : हिंगणघाट शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सोमवारी कलोडे चौक परिसरात कारवाई करून अवैधरित्या काळी रेती वाहतूक करणारा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर, ट्रॉली व सुमारे १०० फूट ब्रास ओलसर रेती असा एकूण ₹५.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नांदगाव चौकाकडून कलोडे चौकाच्या दिशेने अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने नाकाबंदी करून लाल रंगाचा महिंद्रा ट्रॅक्टर अडविला. चालकाने आपले नाव देवदत्त विठ्ठलराव वरखेडे (वय ४३, रा. मास्टर कॉलनी, हिंगणघाट) असे सांगितले.
पंचासमक्ष पाहणी केली असता ट्रॅक्टर व ट्रॉलीवर कोणताही नोंदणी क्रमांक नसल्याचे आढळले. ट्रॉलीमध्ये विनापरवाना काळी रेती भरलेली असल्याने ट्रॅक्टर, ट्रॉली व रेती असा एकूण ₹५.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक आणि पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकातील पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे, पो.शि. रोहित साठे व पोशी मंगेश वाघमारे यांनी केली.
तपासाकडे लक्ष
या कारवाईनंतर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरवर नोंदणी क्रमांक नसल्याने या वाहनाचा मूळ मालक कोण आहे?, अवैध रेती व्यवसायामागील मुख्य सूत्रधार कोण?, तसेच या वाहतुकीचे जाळे किती मोठे आहे? याचा तपास पोलीस करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार नांदगाव–कलोडे मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची चर्चा असून, अशा वाहतुकीवर सातत्याने मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा तपास पुढे नेऊन संपूर्ण साखळी उघडकीस येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments