बसस्टँड ते झाशी राणी चौक रस्त्याची दुरवस्था; ८ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया
हिंगणघाट शहरातील बसस्टँड चौक ते झाशी राणी चौक या अत्यंत वर्दळीच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून सर्वत्र खड्डे पडल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी, अन्यथा आठ दिवसांनंतर रस्त्यावर बसून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या व माजी नगरसेविका शुभांगी सुनील डोंगरे यांनी दिला आहे.
यासंदर्भात त्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या मार्गावर अनेक शाळा, ट्युशन क्लासेस आणि नामांकित रुग्णालये असल्याने विद्यार्थी, रुग्ण, महिला व नागरिकांची दिवसभर मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून दररोज लहान-मोठे अपघात घडत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्तीची कामे न झाल्याने नागरिकांना चिखल आणि खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून तातडीने रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी शुभांगी डोंगरे यांनी केली आहे.
प्रशासनाने आठ दिवसांच्या आत काम सुरू न केल्यास रस्त्यावर बसून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

Post a Comment
0 Comments