Type Here to Get Search Results !

भरदिवसा हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या युवकाला अटक; वर्धा शहर डीबी पथकाची धडक कारवाई

 

भरदिवसा हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या युवकाला अटक; वर्धा शहर डीबी पथकाची धडक कारवाई


         वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया

वर्धा : शहरातील पूलफैल चौक परिसरात भरदिवसा हातात धारदार लोखंडी तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीच्या ताब्यातून धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यातील कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (३० जून) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास डीबी पथक शहर परिसरात नियमित गस्त घालत असताना मुखबिराकडून पूलफैल चौक येथे एक युवक हातात धारदार तलवार घेऊन जोरजोरात ओरडत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाव घेत सापळा रचला.

घटनास्थळी संबंधित युवक सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन धुमाकूळ घालत असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी घेराव घालून शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला निशस्त्र करून पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान त्याच्या ताब्यातून एक धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. घटनास्थळाचा पंचनामा करून तलवार जप्त करण्यात आली तसेच ई-साक्ष ॲपद्वारे संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण व छायाचित्रण करण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव प्रज्वल उर्फ पज्या सुभाष चचाणे (वय २७, रा. पूलफैल, वर्धा) असे सांगितले. आरोपी हा धारदार शस्त्र बाळगून दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा संशय असल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली, वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत करण्यात आली. कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड तसेच पोलीस अंमलदार महेंद्र पाटील, अभिजीत वाघमारे, रंजीत भुरसे आणि अमोल साळवन यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments