*
हिंगणघाट ते जाम महामार्गावरील नवीन डांबरीकरण ८ दिवसांतच उखडले, भ्रष्ट कारभारामुळे जनतेचा जीव धोक्यात !*
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया
*हिंगणघाट* :हिंगणघाट विधानसभेतून जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग ४४ (NH-44) वरील हिंगणघाट ते जाम या दरम्यानचा रस्ता थेट मृत्यूला निमंत्रण देत आहे. येथील जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी नुकतेच नवीन डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, संबंधित कंत्राटदाराच्या निकृष्ट आणि भ्रष्ट कामामुळे अवघ्या आठ दिवसांच्या आत हे डांबरीकरण उखडले असून रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे तयार झाले आहेत. दरवर्षी हजारो कोटींचा टोल आणि कर (Tax) भरणाऱ्या हिंगणघाट जनतेच्याच नशिबी असा जीवघेणा विकास का ?, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.हा महामार्ग हिंगणघाट, समुद्रपूर हे दोन तालुके जोडण्यासोबतच नागपूर आणि चंद्रपूर या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा अत्यंत मुख्य रस्ता आहे.हिंगणघाट शहर आणि ग्रामीण भागातील हजारो महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, कर्मचारी आणि व्यावसायिक दररोज आपल्या दैनंदिन कामासाठी याच मार्गावरून ये-जा करतात.नवीन डांबरीकरण उखडल्यामुळे आणखी जीवघेणे खड्डे पडले त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून पावसाळ्यात प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.हिंगणघाट विधानसभेचे नागरिक दरवर्षी प्रामाणिकपणे सरकारला विविध कर आणि टोल टॅक्सच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल देतात.जनतेच्याच टॅक्सच्या पैशातून विकासकामे केली जातात, मात्र भ्रष्ट कारभारामुळे हिंगणघाटच्या नशिबी केवळ निकृष्ट दर्जाची कामे येत आहेत. अवघ्या आठ दिवसांत रस्ता उखडल्याने कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार उघड झाला आहेत.अश्या घटना वारंवार घडत असल्यामुळे ,स्थानिक जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे, संबंधित विभागावर आणि कंत्राटदारांवर कसलेही वर्चस्व राहिलेले नाही का ?, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.निकृष्ट काम करणाऱ्या दोषी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर फौजदारी कारवाई का केली जात नाही? त्यांचाकडून पुन्हा दर्जेदार काम करून घेण्यास लोकनियुक्त लोकप्रतिनिधी,जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण का लक्ष देत नाही ?निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी हिंगणघाटच्या जनतेचा जीव इतका स्वस्त झाला आहे का ?, असा संतप्त सवाल आता मतदार उघडपणे विचारत आहेत.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आणि स्थानिक प्रशासनाने या भ्रष्ट कामाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. हा महामार्ग तात्काळ दर्जेदार पद्धतीने दुरुस्त न केल्यास, हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील जनता आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधात रस्ता रोको आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे.

Post a Comment
0 Comments