Type Here to Get Search Results !

जो चुकला नियमाला, तो मुकला जीवनाला"; शालेय बस व ऑटोचालकांसाठी वर्ध्यात वाहतूक सुरक्षा कार्यशाळा

 "

जो चुकला नियमाला, तो मुकला जीवनाला"; शालेय बस व ऑटोचालकांसाठी वर्ध्यात वाहतूक सुरक्षा कार्यशाळा


वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया              

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या उद्देशाने परिवहन समितीच्या वतीने शनिवारी (दि. 18 जुलै) न्यू इंग्लिश कॉन्व्हेंट, वर्धा येथे स्कूल बस व ऑटो रिक्षा चालक-मालकांसाठी एकदिवसीय वाहतूक सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेत वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक फौजदार रियाज खान यांनी शालेय वाहनांसाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. स्कूल बसमध्ये आपत्कालीन दरवाजा, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी उपलब्ध असणे तसेच विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मदतनीसाने सुरक्षितपणे रस्ता पार करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑटो रिक्षामध्ये समोरील बाजूस विद्यार्थ्यांना बसवू नये, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करू नये, अनधिकृत वाहनांचा वापर टाळावा, प्रत्येक चालकाने पोलीस पडताळणी करून घ्यावी, वाहनात मोठ्या आवाजात संगीत वाजवू नये आणि अतिवेगाने वाहन चालवू नये, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

यावेळी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली. अमली पदार्थांच्या सेवनामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन आर्थिक नुकसान तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू शकते, असे सांगत "नको अमली पदार्थांची नशा, आयुष्याची होईल दूरदशा" असा संदेश देण्यात आला.

तसेच आपत्कालीन सेवांसाठी 112 (पोलीस), 108 (रुग्णवाहिका), 1098 (चाइल्ड हेल्पलाइन) तसेच महिला सुरक्षा हेल्पलाइनबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.

ही कार्यशाळा वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आली. कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्या गावंडे मॅडम, खत्री सर तसेच शाळेतील बस व ऑटो रिक्षा चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments