खंडोबा वॉर्डात गांजा विक्रीवर पोलिसांची धाड; युवक अटकेत
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैयाहिंगणघाट प्रतिनिधी : अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत हिंगणघाट पोलिसांनी खंडोबा वॉर्ड परिसरात धडक कारवाई करत गांजा जप्त केला. या प्रकरणी एका २१ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे २४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे व सहकाऱ्यांचे पथक निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर कारवाईसाठी गस्त घालत असताना, खंडोबा वॉर्ड येथे राहणारा राहुल सुभाष दानव (वय २१) हा गांजा विक्रीसाठी आपल्या राहत्या घरी अंमली पदार्थ साठवून असल्याची खात्रीशीर माहिती मुखबिरामार्फत मिळाली.
सदर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंच, पोलीस कर्मचारी व फॉरेन्सिक पथकासह आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. कायदेशीर झडतीदरम्यान घरातील लोखंडी कपाटातून ३८२ ग्रॅम गांजा (किंमत ९,४०० रुपये) तसेच विवो कंपनीचा मोबाईल (किंमत १५,००० रुपये) असा एकूण २४,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोलीस नाईक राजेश शेंडे, पोलीस शिपाई आशिष नेवारे, मंगेश वाघमारे व रोहित साठे यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल स्थूल करीत आहेत.

Post a Comment
0 Comments