Type Here to Get Search Results !

वाहतूक सुरक्षा हा सुरक्षित जीवनाचा मार्ग" – सहा. फौ. रियाज खान; सुशील हिम्मतसिंग विद्यालयात परिवहन समितीची कार्यशाळा

 "

वाहतूक सुरक्षा हा सुरक्षित जीवनाचा मार्ग" – सहा. फौ. रियाज खान; सुशील हिम्मतसिंग विद्यालयात परिवहन समितीची कार्यशाळा


वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया



वर्धा, दि. २७ : रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण कमी करून जीवितहानी टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक फौजदार रियाज खान यांनी केले.

सुशील हिम्मतसिंग विद्यालय, महिला आश्रम, वर्धा येथे परिवहन समितीच्या वतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेत शाळेच्या ऑटो, व्हॅन व स्कूल बस चालक-मालकांना वाहतूक नियम, वाहनांची नियमित तपासणी, सुरक्षित वाहनचालना आणि अपघात टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी रियाज खान यांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवरही प्रकाश टाकला. गुटखा, तंबाखू, गांजा, ड्रग्ज आदी व्यसनांमुळे मानसिक व शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात तसेच व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.

वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या आदेशानुसार या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शेषराव पाटील होते, तर सचिव मंगेश कोपुलवार उपस्थित होते. शाळेतील ऑटो, व्हॅन व स्कूल बस चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक प्रदीप साखरकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments