Type Here to Get Search Results !

हिंगणघाटमध्ये दारूच्या नशेत व्हिडिओ गेम पार्लरवर हल्ला; ८ मशीन फोडल्या, १० हजारांची लूट

 

​* राजकीय व 'बोगस' पत्रकाराचे संरक्षण असल्याचा आरोप; पीडिताची नागपूर डीआयजी आणि वर्धा एसपींकडे धाव

वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया

शहरातील कलोडे चौक परिसरातील एका परवानाधारक व्हिडिओ गेम (कॉईन मशीन) पार्लरवर दारूच्या नशेत आलेल्या दोन गुंडांनी धुडगूस घालत जोरदार तोडफोड केली. या हल्ल्यात सुमारे ७० हजार रुपयांच्या आठ मशीन उद्ध्वस्त करण्यात आल्या असून, गल्ल्यातील ८ ते १० हजार रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने आणि एका स्वयंघोषित पत्रकाराचे आरोपींना संरक्षण असल्याने पीडिताने थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

​फुकट खेळण्यास नकार दिल्याने तुघलकी अत्याचार

​पीडित व्यावसायिक प्रमोद तुकाराम मुंढे (वय ३६, रा. हिंगणघाट) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कलोडे चौक येथे त्यांचे शासनमान्य व्हिडिओ गेम पार्लर आहे. २२ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पार्लर बंद करण्याची तयारी सुरू असताना पिंपळगाव रोड येथील जयंत पोहणे आणि विकी मगरे हे दोघे दारूच्या नशेत दुकानात घुसले. त्यांनी पार्लरमधील कर्मचारी आदर्श महैसगवडी (२५) याला फुकट गेम खेळू देण्याची मागणी केली. आदर्शने नकार दिला असता, आरोपींनी त्याला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली.

​त्यानंतर आरोपींनी लाकडी बुक्के, दगड आणि लोखंडी रॉडने दुकानातील सर्व ८ कॉईन मशीन फोडून टाकल्या. यात ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच गल्ल्यातील १० हजार रुपयांची रोख रक्कम जबरीने लुटून नेली.

​"पोलीस ठाण्यात जाशील तर जिवंत सोडणार नाही!"

घटनेनंतर प्रमोद मुंढे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असताना, आरोपींनी त्यांना वाटेत अडवून जिवंत मारण्याची थेट धमकी दिली. तरीही मुंढे यांनी धैर्याने हिंगणघाट पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.


​'बोगस' पत्रकाराचा हस्तक्षेप आणि उलटी कारवाई?

​तक्रारदाराचा आरोप आहे की, हिंगणघाट येथील निशानपुरा भागातील 'खान' नावाचा एक स्वयंघोषित व बोगस पत्रकार या आरोपींच्या पाठीशी उभा आहे. त्याच्या दबाव आणि हस्तक्षेपामुळेच पोलीस कारवाईत विलंब केला जात आहे.

​इतकेच नव्हे तर, स्वतःवरील कारवाई टाळण्यासाठी आरोपींनी त्यांच्या साथीदारांमार्फत तक्रारदार प्रमोद मुंढे आणि त्यांचे मित्र विशाल माधनकर यांच्यावरच एक बनावट एनसीआर (NCR No. 1076/2026) दाखल घडवून आणली आहे. मुख्य आरोपींवर अद्याप ठोस कारवाई किंवा अटक न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

​वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे प्रमुख मागण्या:

​हिंगणघाट पोलिसांकडून योग्य न्याय मिळत नसल्याचे पाहून प्रमोद मुंढे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक (नागपूर), जिल्हा पोलीस अधीक्षक (वर्धा) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (हिंगणघाट) यांच्याकडे २८ जुलै रोजी लेखी निवेदन सादर केले आहे.

  • ​कठोर कारवाई: आरोपी जयंत पोहणे आणि विकी मगरे यांच्यावर मारहाण, तोडफोड, दरोडा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा नोंदवून अटक करावी.
  • ​खोटी तक्रार रद्द करा: मुंढे व माधनकर यांच्यावर दाखल करण्यात आलेली बनावट NCR क्र. १०७६/2026 निष्पक्ष चौकशी करून रद्द करण्यात यावी.
  • ​बोगस पत्रकाराची चौकशी: आरोपींना पाठीशी घालणारा निशानपुरा येथील स्वयंघोषित पत्रकार 'खान' याच्या भूमिकेची सखोल चौकशी करून त्याच्यावरही कारवाई व्हावी.
  • ​नुकसानभरपाई व संरक्षण: लुटलेली रक्कम आणि ७० हजार रुपयांचे नुकसान आरोपींकडून वसूल करून द्यावे. तसेच तक्रारदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे.

​शहरात भीतीचे वातावरण

​कायदेशीर परवाना घेऊन व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यावर असा भरदिवसा/रात्री डाका पडणे आणि आरोपींना स्थानिक पातळीवर राजकीय व बोगस पत्रकारांचे संरक्षण मिळणे, या मुळे हिंगणघाटमधील लहान व्यावसायिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. आता पोलीस प्रशासन या हप्तेखोरी आणि गुंडगिरीला खतपाणी घालणाऱ्या घटकांवर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments