*
तीन अल्पवयीन मुलींच्या मृत्यूनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; हिंगणघाटमध्ये वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई*
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया
150 हून अधिक वाहने कारवाईच्या कक्षेत; विनालायसन्स, विनाकागदपत्रे, ट्रिपल सीट, रॉंग साईड आणि विना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई
हिंगणघाट : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात तीन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात आक्रोश आणि शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेबाबत गांभीर्य दाखवत नगर परिषद सभागृहात तातडीने संयुक्त आढावा बैठक घेतली.
या बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, महामार्ग विभाग, वन विभाग आणि नगर परिषद अधिकाऱ्यांनी वाहतूक व्यवस्थेबाबत चर्चा केली. वाहतूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर हिंगणघाट पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली.
सकाळी सुमारे १० वाजल्यापासून शहरातील प्रमुख मार्ग आणि चौकांमध्ये वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. विनालायसन्स, विनाकागदपत्रे, ट्रिपल सीट, रॉंग साईड, विना नंबर प्लेट तसेच भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणारी अनेक वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली.
दिवसभर चाललेल्या या मोहिमेत १५० हून अधिक वाहने कारवाईच्या कक्षेत आली. वाहतूक शाखेने नियमानुसार दंड वसूल केल्यानंतर वाहने सोडण्यात आली. तसेच वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत समज देण्यात आली.
पोलिसांच्या या कारवाईचा उद्देश केवळ दंड वसूल करणे नसून वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि शिस्त लावणे हा आहे. तीन अल्पवयीन मुलींच्या मृत्यूनंतर झालेल्या या कारवाईमुळे शहरातही चर्चा सुरू झाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या निर्देशानुसार आणि पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत वाहतूक शाखा, डीबी पथक, समुद्रपूर, वडनेर आणि गिरड पोलीस कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने होमगार्ड सहभागी झाले होते. प्रशासनाच्या या कारवाईमुळे शहरात वाहतूक नियमांबाबत कडक संदेश गेला आहे.


Post a Comment
0 Comments