Type Here to Get Search Results !

हिंगणघाटच्या सौंदर्यात नवी भर; तीन भव्य प्रवेशद्वारांसह आकर्षक विद्युत रोषणाईचे लोकार्पण


हिंगणघाटच्या सौंदर्यात नवी भर; तीन भव्य प्रवेशद्वारांसह आकर्षक विद्युत रोषणाईचे लोकार्पण


वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया

हिंगणघाट शहराच्या विकासाला अधिक गती देतानाच शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणाऱ्या तीन भव्य प्रवेशद्वारांचे तसेच आकर्षक विद्युत रोषणाईच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे  आमदार समीरजी कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.


शहरातील नागरिक तसेच हिंगणघाटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेणारी ही भव्य प्रवेशद्वारे आता शहराची नवी ओळख ठरणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील सप्तरंगी भव्य प्रवेशद्वार, तहसील कार्यालयासमोरील भव्य प्रवेशद्वार आणि गोकुळधाम मैदानासमोरील भव्य प्रवेशद्वार अशा तीन ठिकाणी उभारण्यात आलेल्या या प्रवेशद्वारांमुळे शहराच्या सौंदर्यात निश्चितच भर पडली आहे. त्याचबरोबर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी हिंगणघाट शहराचे रूप अधिक देखणे आणि आकर्षक दिसणार असून शहराला एक नवी ओळख प्राप्त होणार आहे.


या प्रसंगी बोलताना आमदार समीरजी कुणावार यांनी हिंगणघाटशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “माझा जन्म हिंगणघाट शहरात झाला आहे. त्यामुळे या शहराशी माझे केवळ राजकीय किंवा सामाजिक नाते नसून अत्यंत जिव्हाळ्याचे आणि भावनिक नाते आहे. हिंगणघाट हे माझे जन्मगाव असल्यामुळे या शहराच्या विकासासाठी आणि शहराला अधिक सुंदर, आधुनिक व विकसित करण्यासाठी काम करताना मला विशेष आनंद आणि समाधान मिळते. हिंगणघाटचा विकास हा माझ्यासाठी केवळ एक विषय नसून ती माझी जबाबदारी आणि माझ्या मनाशी जोडलेली भावना आहे.”


शहराचा विकास करताना केवळ रस्ते, नाल्या किंवा मूलभूत सुविधा यापुरते मर्यादित न राहता शहराचे सौंदर्यीकरण, नागरिकांना चांगले वातावरण आणि शहराची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यावरही भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगणघाट शहर अधिक सुंदर, स्वच्छ, आकर्षक आणि आधुनिक बनविण्यासाठी भविष्यातही विविध विकासकामे सातत्याने सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


या लोकार्पण सोहळ्यास हिंगणघाटच्या नगराध्यक्षा डॉ. नयना उमेश तुळसकर, उपनगराध्यक्ष निलेश ठोंबरे,कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटचे सभापती सुधीरबाबू कोठारी, माजी नगराध्यक्ष गिरधारबाबू राठी , किशोर दिघे, आकाश पोहाणे, उमेश तुळसकर,संजय डेहणे, अंकुश ठाकूर, चंदूभाऊ मावळे, संजय माडे, दिनेश वर्मा,शितल मोहता,किरण वैद्य, पल्लवी बाराहाते,कौशर अंजूम, किर्ती सांयकार, अनिता मावळे, राजाभाऊ मॅडमवार, श्यामभाऊ भिमनवार, शाकीर पठाण, भुषण पिसे, विनोद विटाळे,वामण चंदनखेडे,सोनू आर्या ,रविला आखाडे ,बंटी वाघमारे,यांच्यासह नगरसेवक नगरसेविका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


शहरातील या भव्य प्रवेशद्वारांमुळे हिंगणघाटच्या विकासाची आणि बदलत्या स्वरूपाची नवी झलक नागरिकांना पाहायला मिळत असून, आकर्षक विद्युत रोषणाईमुळे शहराच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. नागरिकांनीही या विकासकामांचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.


हिंगणघाट शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच शहराचे सौंदर्य, ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभव आणि आधुनिकतेचा सुंदर समन्वय साधत हिंगणघाटला एक आदर्श आणि आकर्षक शहर म्हणून विकसित करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments