Type Here to Get Search Results !

आनंदनगरात गावठी दारूच्या भट्टीवर पोलिसांचा छापा; ७.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

आनंदनगरात गावठी दारूच्या भट्टीवर पोलिसांचा छापा; ७.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त


वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया

वर्धा : शहरातील आनंदनगर परिसरात रेल्वे पटरीलगत टीनाच्या शेडमध्ये सुरू असलेल्या गावठी मोहा दारू निर्मितीच्या भट्टीवर वर्धा शहर पोलिसांनी छापा टाकून ७ लाख ३१ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान एजाज खान पठाण व एका महिला आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला असून, दोन्ही आरोपी पसार झाले आहेत.

गावठी मोहा दारू निर्मिती सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने आनंदनगर परिसरातील रेल्वे पटरीलगत असलेल्या टीनाच्या शेडवर धाड टाकली. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ४०० लिटर उकळव, ४ हजार १०० लिटर कच्चा मोहा सडवा रसायन आणि ९० लिटर तयार गावठी मोहा दारू आढळून आली. दारू निर्मितीसाठी लागणारे इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले.

नाशवंत असलेला सडवा, उकळव व इतर साहित्याचा पंचनामा करून नियमानुसार घटनास्थळीच नाश करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ७,३१,३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी एजाज खान पठाण व एका महिला आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपी पसार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक व वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस हवालदार महेंद्र पाटील, अभिजित वाघमारे तसेच पोलीस अंमलदार रंजित भुरसे व अमोल साळवण यांनी कारवाईत सहभाग घेतला.

अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments