Type Here to Get Search Results !

हिंगणघाटात ‘जीवन सुरक्षा’ अभियान; 308 वाहनचालकांवर कारवाई 5 लाख 87 हजार 500 रुपयांचा दंड; अल्पवयीनांना वाहन दिल्याप्रकरणी पालकांवर दोन गुन्हे दाखल

 

हिंगणघाटात ‘जीवन सुरक्षा’ अभियान; 308 वाहनचालकांवर कारवाई

वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया


5 लाख 87 हजार 500 रुपयांचा दंड; अल्पवयीनांना वाहन दिल्याप्रकरणी पालकांवर दोन गुन्हे दाखल


हिंगणघाट, 2 ऑक्टोबर :

वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘जीवन सुरक्षा अभियानांतर्गत’ हिंगणघाट शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध व्यापक कारवाई करण्यात आली. 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या या कारवाईत 308 चलान प्रकरणे दाखल करून एकूण 5 लाख 87 हजार 500 रुपयांचा दंड करण्यात आला.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धाचे प्रभारी अधिकारी विजयकुमार घुले, हिंगणघाट पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली.

वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यावर वाहने उभी करणारे, विनापरवाना वाहन चालविणारे, ट्रिपलसीट प्रवास करणारे, कर्णकर्कश आवाजाचे सायलेंसर वापरणारे, परवाना न बाळगणारे तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.

दरम्यान, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी पालकांविरुद्ध कलम 199(अ) मोटार वाहन कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ड्रंक अँड ड्राइव्हविरोधात कारवाई करत चार वाहनचालकांवर कारवाई करून त्यांची चारही वाहने ताब्यात घेण्यात आली.

वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

वाहनचालकांनी वाहतुकीच्या मार्गावर किंवा गर्दीच्या ठिकाणी अनधिकृतपणे वाहने पार्क करू नयेत, निर्धारित पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करावीत, अल्पवयीन मुलांना वाहने देऊ नयेत, विनापरवाना वाहन चालवू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा आणि चारचाकी चालकांनी सीटबेल्टचा वापर करावा, तसेच ट्रिपलसीट व कर्णकर्कश सायलेंसरचा वापर टाळावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दंड वसुली हा कारवाईचा उद्देश नसून वाहनचालकांमध्ये वाहतूक शिस्त निर्माण करणे आणि नागरिकांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. जीवन सुरक्षा अभियान यापुढेही जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments