तक्रार ज्यांच्याविरोधात, चौकशीही त्यांच्याच ठाण्यात!
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया
फेरचौकशीची जबाबदारी दहेगाव गोसावी पोलिसांकडे; ५ ऑक्टोबरला हजर राहण्याची नोटीस
हिंगणघाट : दहेगाव गोसावी पोलीस ठाण्यात २९ मे २०२६ रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी सचिन वाघे यांनी पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्याकडे फेरचौकशीची मागणी केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी दहेगाव गोसावी पोलीस ठाण्याकडून वाघे यांना ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.
तक्रारीत संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, तक्रारीतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संबंध असलेल्या त्याच पोलीस ठाण्याकडे चौकशीची जबाबदारी देण्यात आल्याने चौकशीच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वाघे यांनी माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रे तसेच १८ ऑगस्ट रोजी अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाहिलेल्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फेरचौकशी करण्याची मागणी केली आहे. न्यायालयीन बचावासाठी सीसीटीव्ही फुटेजची प्रमाणित इलेक्ट्रॉनिक प्रत उपलब्ध करून द्यावी, तसेच स्वतःविरुद्ध करण्यात आलेल्या कलम ११० व ११७ अंतर्गत कार्यवाहीची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी दहेगाव गोसावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत एस. कदम यांच्या स्वाक्षरीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे सूचना पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या चौकशीत कोणती कार्यवाही केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments