हिंगणघाटमध्ये १८ हजारांचा गांजा जप्त; २१ वर्षीय तरुणाला अटक
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया
संत ज्ञानेश्वर वॉर्डातील घरावर पोलिसांची छापेमारी; ३८६ ग्रॅम गांजा हस्तगत
हिंगणघाट : शहरातील अवैध अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कारवाई करत हिंगणघाट पोलिसांनी संत ज्ञानेश्वर वॉर्डातील एका घरावर छापा टाकून ३८६ ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत १८ हजार ८१० रुपये असून, याप्रकरणी अरुण अनिल कुडची (वय २१, रा. संत ज्ञानेश्वर वॉर्ड, हिंगणघाट, जि. वर्धा) याला अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी परिसरात गस्तीवर होते. यावेळी संत ज्ञानेश्वर वॉर्डात राहणारा अरुण कुडची याच्या घरी विक्रीच्या उद्देशाने गांजा साठवून ठेवल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीची उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या आदेशानुसार पंच, पोलीस पथक आणि न्यायवैद्यक विज्ञान पथकाच्या उपस्थितीत संबंधित घराची झडती घेण्यात आली.
३८६ ग्रॅम गांजा जप्त
घराची कायदेशीररीत्या झडती घेतली असता, लाल रंगाच्या पिशवीतील प्लास्टिकमध्ये हिरवट-काळपट रंगाची पाने, फुले, देठ, कळ्या व बिया असलेला गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. त्याचे एकूण वजन ३८६ ग्रॅम असून, त्याची किंमत १८ हजार ८१० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचांसमक्ष जप्तीची कार्यवाही करून हा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
याप्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या आदेशाने करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल स्थूल, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोलीस नाईक राजेश शेंडे, पोलीस शिपाई आशिष नेवारे आणि मंगेश वाघमारे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनकुसरे करीत आहेत.

Post a Comment
0 Comments