अवघ्या आठ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; दोन आरोपी अटकेत
सावंगी मेघे पोलिसांची धडक कारवाई; ४ लाख ६२ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त
संपादक नईमुद्दीन शेख
वर्धा, दि. ४ नोव्हेंबर : सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या आठ तासांत गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेले ४ लाख ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. सावंगी मेघे पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
सावंगी मेघे येथील रहिवासी प्रियंका विठ्ठल चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून कपाटातील सोन्याचे सात दागिने चोरून नेले. यामध्ये मंगळसूत्र, लांब पोत, मिनी मंगळसूत्र, कानातील सुया, अंगठ्या व पोहे हार अशा दागिन्यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत ४ लाख ६२ हजार रुपये आहे.
या प्रकरणी सावंगी मेघे पोलीस ठाण्यात अप. क्र. ८२०/२६, कलम ३०५(अ), ३३१(३) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहितीदाराकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे व गुन्हे शोध पथकाने संशयितांचा शोध घेतला. यावेळी प्रफुल केशवरावजी डोडे (वय ४२) आणि अमोल केशवरावजी डोडे (वय ४६), दोघेही रा. ग्रामपंचायतजवळ, सावंगी, यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले संपूर्ण ४ लाख ६२ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष महादेव सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, विरेंद्र कांबळे, अनिल वैद्य, नितेश फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव व आकाश गोरे यांनी केली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई करीत आहेत.

Post a Comment
0 Comments