मॉडिफाइड सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज; वर्धा पोलिसांचा दणका!
संपादक नईमुद्दीन शेख
धडक कारवाईत चार दुचाकी जप्त; बेकायदेशीर बदल करणाऱ्या वाहनचालकांना इशारा
वर्धा : शहरात मॉडिफाइड सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध वर्धा शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चार मॉडिफाइड सायलेन्सर असलेल्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
दिनांक 20 नोव्हेंबर रोजी रात्री वर्धा शहरातील शिवाजी चौक परिसरात पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना एका दुचाकीवरून मोठ्या आवाजात फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी दुचाकी थांबवून सायलेन्सरची तपासणी केली असता त्यामध्ये बदल करण्यात आल्याचे आढळून आले.
याबाबत अधिक चौकशी केली असता संबंधित दुचाकीस्वाराने क्षितिज तळवेकर आणि आलोडी येथील व्यक्तीचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन तपासणी केली असता अशाच प्रकारचे मॉडिफाइड स्पोर्ट्स बाईक सायलेन्सर बसविलेल्या आणखी दुचाकी आढळून आल्या. पोलिसांनी या चारही दुचाकी जप्त करून संबंधितांविरुद्ध कारवाई केली.
जप्त करण्यात आलेल्या दुचाकी :
यामाहा कंपनीची आर-15 मॉडेल दुचाकी (क्रमांक MH 29 BT 8034).
केटीएम व्हाइट दुचाकी (क्रमांक MH 30 BA 4456).
केटीएम 200 ड्यूक दुचाकी (क्रमांक MH 32 AL 1615).
मॉडिफाइड बजाज पल्सर एनएस 400 झेड दुचाकी (क्रमांक MH 32 BC 8160).
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून कर्णकर्कश आवाज निर्माण करणारे सायलेन्सर वापरू नयेत, असे आवाहन वर्धा शहर पोलिसांनी केले आहे. अशा प्रकारांमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलीस निरीक्षक नागेश कुमार चतुरकर यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार प्रशांत वंजारी, महेंद्र पाटील, नरेंद्र कांबळे, वैभव जाधव आणि रंजित भुरसे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Post a Comment
0 Comments