Type Here to Get Search Results !

वर्धा शहर गुन्हे पथकाची धडाकेबाज कारवाई; 12 तासांत शासकीय वसतिगृह चोरी प्रकरणातील चोर गजाआड वर्धा :

 वर्धा शहर गुन्हे पथकाची धडाकेबाज कारवाई; 12 तासांत शासकीय वसतिगृह चोरी प्रकरणातील चोर गजाआड

वर्धा :

वर्धा शहर गुन्हे पथकाने अवघ्या 12 तासांच्या आत शासकीय मुलींच्या वसतिगृहात चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला सुमारे 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महादेवपुरा परिसरातील मागासवर्गीय शासकीय मुलींचे वसतिगृह सन 2025 पासून बंद आहे. सदर वसतिगृहाची पाहणी करण्यासाठी गृहपाल आठवड्यातून एकदा भेट देत असते. ठरावीक दिवशी वसतिगृहाची तपासणी केली असता, 15 खिडक्यांचे अॅल्युमिनियम फ्रेमचे काही भाग व खिडकीला लावलेला एक्झॉस्ट फॅन गायब असल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने प्रत्येकी अंदाजे 1,000 रुपये किमतीच्या 15 खिडकी फ्रेमचे भाग व 500 रुपये किमतीचा एक्झॉस्ट फॅन असा एकूण 15,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार पोलीस ठाणे वर्धा शहर येथे दाखल करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस ठाणे वर्धा शहर येथे अपराध क्रमांक 0053/26 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ), 305 (ई), 331(3), 331(4) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरात शोधमोहीम राबवून आरोपी विक्की मदन कुयस्कर (वय 30, रा. इंदिरा नगर, आर्वी नाका रोड, वर्धा) यास ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले 15 अॅल्युमिनियम खिडकी फ्रेमचे भाग व एक्झॉस्ट फॅन असा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक वर्धा सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाधमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर तसेच वर्धा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शरद गायवाकड, पोलीस हवालदार महेंद्र पाटील, अभिजित वाघमारे, रंजित भुरसे व अमोल साळवन यांच्या पथकाने केली.

वर्धा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️

Post a Comment

0 Comments