Type Here to Get Search Results !

स्थानीक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी उघड, १.५४ कोटींचा मुद्देमाल जप्त वर्धा,

 स्थानीक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी उघड, १.५४ कोटींचा मुद्देमाल जप्त वर्धा, 


स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत कंटेनरसह तब्बल १ कोटी ५४ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी उपविभाग हिंगणघाट परिसरात पेट्रोलिंग दरम्यान स्थानीक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांना गोपनीय बातमीदाऱ्यामार्फत माहिती मिळाली की, कंटेनर क्रमांक GJ-27-TD-9916 मधून शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. ही माहिती तात्काळ मा. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना कळविण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार अत्यंत गोपनीयतेने विविध पथके नेमून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील संविधान चौक, वडणेर येथे नाकाबंदी करण्यात आली.

नाकाबंदी दरम्यान सदर कंटेनर थांबवून तपासणी केली असता चालकाने आपले नाव विनोदकुमार रामबहादुर यादव (वय ३४, रा. नारोल, अहमदाबाद, गुजरात) व क्लिनरने कमलेश छोटेलाल वनवासी (वय २६, रा. भगवतगंज, प्रतापगड, उत्तरप्रदेश) असे सांगितले. कंटेनरची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये विविध ब्रँडची प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आली. याबाबत कोणताही पास किंवा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी पियुष मानवतकर यांच्या उपस्थितीत तपासणी करून एकूण ६,३०४ किलो सुगंधित तंबाखू (किंमत ₹१,२४,१३,६००) व अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर (किंमत ₹३०,००,०००) असा एकूण ₹१,५४,१३,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस स्टेशन वडणेर येथे गुन्हा क्रमांक ०५/२०२६ अन्वये भा.न्या.संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कलम ३, २६(१), २६(२)(४), २७(३)(ई), ३०(२)(अ), ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी पियुष मानवतकर तसेच स्थानीक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तरित्या यशस्वी केली.                                                                                                         हिंगणघाट प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️

Post a Comment

0 Comments