वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख 🗞️
हरवलेला अजय परतला घरी! वर्धा हिंगणघाट 112 पथकाच्या तत्परतेने घडवला भावनिक पुनर्मिलाप
हिंगणघाट : कुटुंबापासून तब्बल एक महिना दूर राहिलेला, मानसिक आजाराने त्रस्त १९ वर्षीय अजय सिंग अखेर सुखरूप घरी परतला… आणि या आनंदाच्या क्षणामागे कारणीभूत ठरले हिंगणघाटचे सतर्क 112 आपत्कालीन पथक.
राजस्थान राज्यातील झालावाड जिल्ह्यातील नांदिया खेडी येथे राहणारा अजय सिंग भारत सिंग हा २५ जानेवारीपासून बेपत्ता झाला होता. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. आई-वडील रोजंदारी मजूर. दोन मुलांपैकी अजय मोठा. मानसिक आजारामुळे त्याच्यावर उपचार सुरू असतानाच तो अचानक घरातून निघून गेला.
कुटुंबियांनी मोडकठाणा पोलीस स्टेशन येथे हरवल्याची तक्रार नोंदवली. शोधमोहीम सुरू झाली, पण दिवसेंदिवस निराशाच हाती येत होती. मुलगा कुठे गेला, कसा असेल, काय खात असेल—या विचारांनी आई-वडिलांची झोप उडाली होती.
दरम्यान, अनेक टप्प्यांचा प्रवास करत—कधी ट्रकने तर कधी रेल्वेने—अजय महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात येऊन पोहोचला. नांदगाव चौकात तो संशयास्पद व मानसिक अस्वस्थ अवस्थेत फिरताना दिसला. स्थानिक युवक योगेश झाडे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत तत्काळ 112 या टोल-फ्री क्रमांकावर माहिती दिली.
हिंगणघाटचे 112 पथक काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. अजयला सुरक्षित ताब्यात घेऊन त्याला हिंगणघाट येथील बेघर निवारा केंद्रात आश्रय देण्यात आला चार दिवस निवारा मुक्काम व. यानंतर सुरू झाला खरा शोध—त्याच्या कुटुंबाचा!
मोबाईलच्या माध्यमातून आणि विविध संपर्कांच्या मदतीने पथकाने राजस्थानपर्यंत धागेदोरे जोडले. “शोध लागेल की नाही?” या धाकधुकीत अखेर कुटुंबाचा संपर्क साधण्यात पथकाला यश आले. मुलगा सापडल्याची बातमी मिळताच आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले.
आज, १२ फेब्रुवारी रोजी, पथकाच्या उपस्थितीत अजय सिंगला सुखरूप कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. महिनाभरानंतर मुलाला मिठीत घेताना कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
या यशस्वी मोहिमेत ठाणेदार अनिल राऊत यांचे मार्गदर्शनात 112 पथकाचे प्रमुख प्रवीण बोधाणे, स्वप्निल जीवने, प्रमोद डडमल, सागर समृतवार तसेच हिंगणघाट पोलीस व बेघर निवारा केंद्राचे मोलाचे योगदान राहिले. कुटुंबीयांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.
ही घटना केवळ एका युवकाचा शोध नाही, तर संवेदनशीलता, तत्परता आणि मानवतेचा जिवंत पुरावा आहे.
हिंगणघाट 112 पथकाने पुन्हा एकदा दाखवून दिले—आपत्कालीन सेवा केवळ कर्तव्य नाही, तर ती मानवतेची जबाबदारी आहे.

Post a Comment
0 Comments