वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख
भारतीय संस्कृतीत आई-वडिलांचे स्थान सर्वोच्च मानले जाते. या संस्कारमूल्यांची जपणूक करण्याच्या उद्देशाने विद्या विकास प्ले-स्कूल अँड किंडर गार्डन विद्या विकास प्राथमिक शाळा व हायस्कूल, संत तुकडोजी वॉर्ड, नंदोरी रोड, हिंगणघाट येथे शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता मातृ-पितृ पूजन दिन सोहळा अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. नयना उमेश तुळसकर (नगराध्यक्ष, न. पा. हिंगणघाट) उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. पल्लविताई बाराहाते (शिक्षण सभापती, न. पा. हिंगणघाट) तसेच मा. श्री. अजय बिरे (प्राध्यापक, मातोश्री महिला महाविद्यालय, हिंगणघाट) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या माता-पित्यांचे पूजन करून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. “मातृदेवो भव, पितृदेवो भव” या भावनेने भारलेले वातावरण उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारे ठरले. विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्य, गीत व सांस्कृतिक सादरीकरण यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. नयना तुळसकर यांनी पालकांच्या त्याग व कष्टांची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी जीवनात उच्च आदर्श ठेवावेत, असे मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथींनीही विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त व कृतज्ञतेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु चांभारे यांनी तर आभारप्रदर्शन सौ पारधी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन विद्या विकास प्ले-स्कूल अँड किंडर गार्डन तसेच विद्या विकास प्राथमिक शाळा व हायस्कूल, हिंगणघाट यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक मा. श्री. नितेश रोडे यांनी सर्व मान्यवर, पालक व शिक्षकांचे आभार मानले.
कार्यक्रमास पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सौ कोळसे कु मानकर कु तेलंग श्री सिडामे श्री टिपले सौ परबत सौ पुसदेकर कु नाल्हे कु खांदनकर कु हाते कु राऊत सौ पारधी कु चांभारे इत्यादींनी सहकार्य केले.


Post a Comment
0 Comments