हिंगणघाटमध्ये ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद/रस्ते योजना’ आढावा; विधानसभा क्षेत्रातील सर्व रस्त्यांची यादी तातडीने तयार करण्याचे, आमदार कुणावारांचे अधिकाऱ्यांना निर्देश
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेखहिंगणघाट येथील उपविभागीय कार्यालयात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद/रस्ते योजना’ संदर्भात सविस्तर आढावा बैठक पार पडली. आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले. विधानसभा क्षेत्रातील सर्व पात्र शेत पाणंद रस्त्यांची अद्ययावत, वस्तुनिष्ठ व प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करून तातडीने सादर करण्याचे आदेश आमदारांनी दिले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद/रस्ते योजना’ ही शेतकरीहिताची महत्त्वपूर्ण योजना आहे. शेतरस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून ते बारमाही वापरासाठी उपलब्ध करून देणे, शेतीमाल वाहतुकीत सुलभता निर्माण करणे आणि उत्पादन खर्चात बचत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. पूर्वी रोहयो अंतर्गत मजुरांमार्फत केली जाणारी कामे आता यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने अधिक गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जाणार आहेत.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समित्या कार्यरत असून आमदार कुणावार हे विधिमंडळातील समितीचे सदस्य म्हणून कार्य करीत आहेत. समितीत पाच प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश असल्याने स्थानिक गरजा व वस्तुस्थिती लक्षात घेऊन नियोजन केले जात आहे. राज्य शासनाने स्वतंत्र निधीची तरतूद केली असून मार्च २०२६ पर्यंत राज्यात ४५ हजार किलोमीटर शेतरस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच रस्ते मजबुतीकरणासाठी लागणाऱ्या मुरूम, दगड व मातीवर कोणतेही स्वामित्व धन (रॉयल्टी) आकारले जाणार नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
बैठकीदरम्यान आमदार कुणावार यांनी कामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता व वेळेचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला. प्रत्येक गावातील प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन प्राधान्यक्रम ठरवावा, तसेच कोणतीही अडचण प्रलंबित न ठेवता तत्काळ निराकरण करावे, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी, विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे सचिव आकाश अवतारे, उपविभागी पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक, हिंगणघाटचे तहसीलदार योगेश शिंदे, समुद्रपूरचे तहसीलदार कपिल हटकर, सेलूचे तहसीलदार पाराजे, हिंगणघाटचे गटविकास अधिकारी सावसाकडे, समुद्रपूरचे गटविकास अधिकारी टिचकुले, सेलूचे गटविकास अधिकारी पाणबुडे, जि. प. बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता फारूक, सा. बा. विभागाचे अभियंता प्रशांत धमाणे व मोकलकर, हिंगणघाटचे RFO भलावी, समुद्रपूरचे RFO निलेश गावंडे, सेलूचे RFO मिनल तुरखडे तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे सदस्य संजय डेहने, विनोद विटाळे, वामन चंदनखेडे, किशोर शेंडे, नितीन वाघ, संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद/रस्ते योजना’ची प्रभावी अंमलबजावणी होऊन ग्रामीण भागाच्या विकासाला नवी चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment
0 Comments