ब्रिलियंट स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख
२७ फेब्रुवारी रोजी ब्रिलियंट स्कूल, हिंगणघाट येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक श्री. विलास राऊत यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व विद्यार्थ्यांना बोलीभाषेचे महत्त्व समजावून सांगितले व आजच्या काळात मराठीचे महत्त्व ओळखून मराठीत बोलण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कविता व अभंग सादर केले. प्राथमिक विभागातील लहान मुलांनी मराठीतील छोटे-छोटे पण बोलके संवाद व कविता सादर केल्या. मराठी भाषेच्या शिक्षिका जया निखाडे यांनी मराठी भाषेचे महत्त्व व कुसुमाग्रजांचे साहित्यिक योगदान यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी वर्गखोल्यांमध्ये मराठी घोषवाक्ये, रांगोळी आणि पोस्टर्स लावून शाळा सजवली होती. कार्यक्रमाचा समारोप ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या समूहगायनाने आणि पसायदान गायनाने झाला.
या दिवशी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचे जतन व प्रसार करण्याची प्रतिज्ञा घेतली, आणि शाळेच्या वातावरणात एक वेगळीच सांस्कृतिक उर्जा जाणवली. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान आणि जतनाची भावना वाढवण्याचा हा स्तुत्य उपक्रम खरोखरच यशस्वी ठरला.

Post a Comment
0 Comments