Type Here to Get Search Results !

हिंगणघाट : पवनगावचा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद ! आमदार समीर कुणावारांच्या प्रयत्नांना यश, शेतकऱ्यांना दिलासा

 

हिंगणघाट : पवनगावचा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद ! आमदार समीर कुणावारांच्या प्रयत्नांना यश, शेतकऱ्यांना दिलासा    


      

           वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया



पवनगाव (करूळ) परिसरातील वाघ अखेर जेरबंद


आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा


समुद्रपूर तालुक्यातील पवनगाव (करूळ) परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाच्या वावरामुळे नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याचदरम्यान वाघाच्या हल्ल्यात शेतकरी श्री. विशाल मुन जखमी झाल्याची गंभीर घटना घडली.


घटनेची माहिती मिळताच आमदार समीर कुणावार यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जखमी शेतकरी श्री. विशाल मुन यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच परिसरातील परिस्थितीची माहिती घेत नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत वनविभागाकडून तातडीने प्रभावी उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.


या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत आमदार समीर कुणावार यांनी राज्याचे वनमंत्री मा. ना. श्री. गणेशजी नाईक साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. पवनगाव परिसरातील परिस्थिती तसेच नागरिक व शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या भीतीची संपूर्ण माहिती वनमंत्र्यांना देत, संबंधित वाघाला तातडीने जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली.


यानंतर आमदार कुणावार यांनी वनविभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवत वाघाचा शोध घेऊन त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. नागरिक, शेतकरी आणि पशुधनाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत परिसरात आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतही त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधला.


वनविभागाच्या पथकाने तत्परतेने सुरू केलेल्या मोहिमेला अखेर यश आले आणि दि. २९ सप्टेंबर रोजी पवनगाव (करूळ) परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, अनेक दिवसांपासून असलेले भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत झाली आहे.


वाघ जेरबंद झाल्यानंतर आमदार समीर कुणावार यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि संपूर्ण कारवाईची माहिती घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्परतेने कार्य करत यशस्वी कारवाई करणाऱ्या वनविभागाच्या संपूर्ण पथकाचे त्यांनी अभिनंदन केले.


या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आमदार समीर कुणावार यांनी सांगितले की, “नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. पवनगाव परिसरातील परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत आवश्यक कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात आला. नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी भविष्यातही आवश्यक त्या उपाययोजनांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.”


वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे पवनगाव परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील प्रभावी समन्वयातून तातडीने करण्यात आलेल्या कार्यवाहीचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरले आहे.

Post a Comment

0 Comments