हिंगणघाटात चोरीचा गुन्हा उघड; १.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया
हिंगणघाट : शहरातील ढोकपांडे लेआउट परिसरातील टिनाच्या शेडमधून लोखंडी साहित्य, कॉपर केबल आणि बॅटरी चोरी केल्याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका संशयिताला ताब्यात घेऊन सुमारे १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात २६ ऑक्टोबर रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७००/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) व ३३४(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरा गांधी वॉर्ड येथील सूरज झित्रुजी आस्कर (वय ३३) यांच्या ढोकपांडे लेआउट परिसरातील टिनाच्या शेडमधून अज्ञात व्यक्तीने लोखंडी साहित्य, बॅटरी व वायर चोरून नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला.
गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदगाव बालाजी जिनिंग परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या राम रमेशराव राऊत (वय १९) याच्या घरी जाऊन चौकशी केली. यावेळी चोरीच्या साहित्याबाबत विचारपूस केली असता, त्याने चुलत भाऊ अर्जुन सातपुते याच्या मदतीने ढोकपांडे लेआउट येथील टिनाच्या शेडमधून साहित्य चोरल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर संशयिताच्या घराजवळील आबादी जागेतून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये ३२ एमएमचे ५०० लोखंडी रॉड, १०० मीटर कॉपर केबल, ३०० लोखंडी चेक नट, ५०० लोखंडी रॉड, १७० लोखंडी बुल्ले आणि ट्रॅक्टरची जुनी लाल रंगाची बॅटरी यांचा समावेश असून, या साहित्याची एकूण किंमत सुमारे १ लाख २५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक आणि हिंगणघाट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोलीस नाईक राजेश शेंडे, पोलीस शिपाई आशिष नेवारे आणि मंगेश वाघमारे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे

Post a Comment
0 Comments