गौवंश तस्करीवर हिंगणघाट पोलिसांचा दणका
२२ जनावरांसह १६.४० लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया
हिंगणघाट : नागपूर-जाम मार्गावरून हिंगणघाटकडे अवैधरीत्या गौवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर हिंगणघाट पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत २२ गौवंश जनावरांसह लाल रंगाची आयशर गाडी असा एकूण १६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, वाहनचालक वाहन जागेवर सोडून पसार झाला.
दि. ७ ऑक्टोबर रोजी हिंगणघाट पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी रात्री गस्तीवर असताना नागपूर-जाम मार्गावरून हिंगणघाटकडे लाल रंगाच्या आयशर वाहनातून गौवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी डी-मार्टसमोर नाकाबंदी केली.
काही वेळाने माहितीतील वर्णनाप्रमाणे लाल रंगाचे आयशर वाहन हिंगणघाटकडे येताना दिसले. पोलिसांनी हात दाखवून वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहन काही अंतरावर थांबवून वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये २२ गौवंश जनावरे दाटीवाटीने भरून, दोरखंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. जनावरांची निर्दयपणे व क्रूरतेने वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी २२ गौवंश जनावरे, अंदाजे किंमत ४ लाख ४० हजार रुपये, तसेच एमएच ४०-सीटी-७८९३ क्रमांकाची आयशर गाडी, किंमत अंदाजे १२ लाख रुपये, असा एकूण १६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलिस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण नगराळे , पोलिस हवालदार प्रवीण बोधाने, किशोर गाडेवान, पोलीस शिपाई स्वप्निल निकुरे, रोहित साठे तसेच सैनिक सुरज चंदनखेडे यांनी केली.

Post a Comment
0 Comments